डेक्कन पोलिसांकडून दोघे भाऊ जेरबंद
पुणे(प्रतिनिधी) – करानोमुळे मास्कचा वापर बंधनकारक आहे. पण, हीच बाब गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली आहे. दरवेळी गुन्हे करण्यासाठी नवी पद्धत वापरणाऱ्या गुन्हेगारांना आता मास्क वापरुन गुन्हे करणे सोपे झाले आहे. अशाच एका “मास्कधारी गॅंग’ने शहरात धुमाकूळ घातला होता. ही गॅंग व्यापाऱ्यांना “टार्गेट’ करत होती. मागील काही दिवसांत गॅंगने अगदी दोन हजारांपासून ते दोन लाखांपर्यंतची रोकड लुटली आहे.
गॅंगमधील काही सदस्य दुकानदाराचे लक्ष खरेदीच्या बहाण्याने विचलित करतात. तर ही संधी साधत एखादा चोरटा गल्ल्यातील रोकड लंपास करायचा. या गॅंगला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केले आहे. दीपक किशोर चौधरी(30) आणि अभिजित किशोर चौधरी(19,रा.सुंदरबन, मांगडेवाडी, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार मात्र फरार आहेत.
या टोळीने आजवर सहकारनगर, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, डेक्कन आणि येरवडा भागातील दुकानांना लक्ष्य केले होते. दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये “फेस मास्क’ वापरला आहे. विशेष म्हणजे, ही टोळी सीसीटीव्ही नसलेली दुकाने निवडली होती. दुसरे म्हणजे दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात वस्तू लावलेल्या असतील, तर त्याच्या खरेदीचा बहाणा केला जातो. यावेळी दुकानदार गल्ला सोडून दुकानाबाहेर येईल, हे पाहिले जात होते. दुकानदार दुकान सोडून बाहेर आला की त्यांच्यातील एक सदस्य गल्ल्यातील रोख रक्कम चोरत होता.
डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. यातील फिर्यादी अखिल अहमंद(19,रा.कोंढवा) यांचे कर्वे रस्ता येथे इंडीयन कारपेट ऍण्ड आर्ट नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात 14 ऑगस्ट रोजी चार जण ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी कारपेट घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीला दुकानाबाहेर बोलावले होते. त्यांना बोलण्यात गुंतवून एकाने गल्लयातील पाच हजार रुपये चोरले. तर दुसऱ्या एका घटनेत एका 73 वर्षीय महिलेचे गोविंद शॉपी नावाचे दुकान आहे. तेथे दोघांनी जाऊन दुकानात दुधाची ऑर्डर देण्याचा बहाणा केला. यानंतर त्यांची नजर चुकवत गल्लयातील रोख 18 हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.एल.झांजुर्णे करत आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने वैष्णवी विहार सोसायटी कात्रज येथे छापा टाकून 30 हजार रुपये किंमतीचे हुक्का फ्लेवर व प्रतिबंधीत इम्पोर्टेड सिगारेट जप्त केल्या. याप्रकरणी फैझल मोहम्मद शेख (वय.30,रा. कोरेगाव पार्क) याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, कर्मचारी शिंदे, पवार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मंगेश पवार यांना शेख हा कात्रज परिसरातील एका सोसायटीत हुक्का फ्लेवर व बंदी असलेल्या सिगारेटची विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चाैकशी करून झडती घेतली असता, मुद्देमाल मिळून आला. पंचासमक्ष माल जप्त करून शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.