पिंपरी – महापालिकेने मराठी भाषा संवर्धन समिती सलग दुसऱ्यांदा गठित केल्यानंतरही त्या समितीच्या माध्यमातून गेल्या साडेपाच वर्षात ठोस स्वरूपाचे काम झालेले नाही. समितीच्या तीन बैठका झाल्या. त्यामध्ये विविध सूचना करण्यात आल्या. मात्र, या सुचनांनुसार अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शहरात ही समिती आणि मराठीचे संवर्धन फक्त कागदावरच राहिले आहे.
शहर पातळीवर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने सप्टेंबर 2016 मध्ये स्थायी समिती सभेने मराठी भाषा संवर्धन समितीला मंजुरी दिली. मात्र, निवडणूक आचारसंहिता व अन्य कारणांमुळे या समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या समितीचे नव्याने गठन करण्यात आले. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने 14 डिसेंबर 2018 च्या ठरावानुसार मराठी भाषा संवर्धन समितीला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर समितीची 7 मार्च 2019 ला पहिली सभा झाली. त्यामधे परिचय व सूचना करण्यात आल्या. समितीच्या आत्तापर्यंत एकूण 3 बैठका झाल्या आहेत.
त्यामध्ये दोन ऑफलाइन तर, एक ऑनलाइन बैठक झाली. समितीच्या अधिकृत सदस्यांची दरमहा एक बैठक घेण्यात यावी. पुण्यातील सुदर्शन रंगमंचाच्या धर्तीवर साहित्यिकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी 150 आसन क्षमतेचा एक सुसज्ज हॉल उपलब्ध करून द्यावा. संगीत अकादमीप्रमाणे मराठी साहित्य अकादमीची स्थापना करावी. शहरातील कवी, कथाकार, कादंबरीकार, प्रकाशक, कथाकार, कादंबरीकार, कलाकारांची एक सूची तयार करून त्याचे पुस्तक प्रकाशित करण्यात यावे. साहित्य बाग निर्माण करून विभागवार मराठी साहित्य वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या साहित्यिकांनी या समितीच्या माध्यमातून केल्या होत्या. मात्र, या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार यांच्यासाठी काम होणे अपेक्षित होते. मात्र, त्या माध्यमातून आवश्यक कामांना गती मिळू शकलेली नाही. या समितीच्या प्रमुख पदावर साहित्यिकांना संधी देण्यात यावी. या समितीच्या माध्यमातून चांगले काम व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– राजन लाखे, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती.
मराठी भाषा समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकांमधून ठोस असे काही साध्य होऊ शकलेले नाही. साहित्यिकांनी केलेल्या विविध मागण्यांची पुर्तता प्रलंबित आहे. विविध विषयांसाठी उपसमित्या बनविण्यात आल्या. मात्र, त्यासाठी निधीची तरतूदच केलेली नाही.
– राज अहेरराव, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती