Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मराठा आरक्षणाबाबतची जरांगे यांची मागणी पूर्ण व्हावी, यासाठी सरकारच्या देखील हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीला पोहचले आहेत. संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.
आज मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगात आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते त्यावेळी सर्वात पहिल्यांदा संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे दिसत आहेत.
तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांनी जाहीरपणे विरोध केला आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भूजबळ आणि जरांगे पाटील यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होत आहे. काल पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते. “जुनाट नेत्याला सरकारने रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे. ओबीसी बांधव आणि आम्ही एकत्र असताना तो छगन भुजबळ सांगतो याचे (मनोज जरांगे पाटील)पाय तोडा, ओबीसींच्या विरोधात बोललो तर पाय तोडू सांगतो. मी ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललोच नाही. मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतो आहे. यांचा विचार चांगला नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले होते.