मेदिनीनगर – बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय माओवादी या नक्षलवाद्यांच्या संघटनेच्या गनिमांनी आज सकाळी लटेहर जिल्ह्यात एके ठिकाणी रेल्वेचे रूळ उडवले. त्यामुळे बरकाकाना ते गरवा दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली.
रिचुगुठा आणि देमु या दोन स्थानकांच्या दरम्यानचा रेल्वे रुळाचा काही भाग या प्रकारामुळे उद्ध्वस्त झाला. या संघटनेने आपला नेता प्रशांत बोस यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्या भागात बंद पुकारला आहे. या बंदच्या काळातच हा प्रकार घडला आहे.
प्रशांत बोस हा पोलिसांना बरेच दिवस वॉन्टेड असलेला नक्षलवादी म्होरक्या आहे. त्याला पकडून देण्यासाठी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बोस हा झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील शंभरहून अधिक घातपाती कारवायांसाठी वॉंटेड नक्षलवादी ठरला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.