नवी दिल्ली: अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या सवलतीमध्ये टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स म्हणजे टीडीएस मध्ये 25 टक्क्यांची सवलत दिल्यामुळे याचा अनेकांना लाभ होणार आहे. लाभांश वितरण, विमा पॉलिसी प्रीमियम भरणा, भाडे, अस्थायी मालमत्तेचा ताबा इत्यादी वेळी केल्या जाणाऱ्या पेमेंट वेळी स्त्रोतात कर कपात केली जाते. यामध्ये तब्बल 25 टक्क्यांची सूट 31 मार्चपर्यंत देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने या योजनेची तात्काळ अंमलबजावणी केली आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार हि योजना 14 मेपासून सुरू झाली असून 31 मार्च 2021 पर्यंत अंमलात राहणार आहे.
बॅंकातून काढल्या जाणाऱ्या मोठ्या रकमावर टीडीएस कायम
असे असले तरी बॅंकेतून एक कोटीपेक्षा जास्त रक्कम काढल्यास त्यावर 1 टक्के टीडीएस कायम राहणार आहे. त्याचबरोबर परदेशातून आलेल्या पैशावरही टीडीएस कायम राहणार आहे.
प्राप्ती कर विभागाने केलेल्या स्पष्टीकरणावर नुसार 23 व्यवहारावरील टीडीएसमध्ये कपात करण्यात आली आहे. रोख्यावरील व्याज, बॅंक खात्यावरील व्याज, लाभांश वितरण यावर अगोदर 10% टीडीएस होता तो आता साडेसात टक्के करण्यात आला आहे. उद्योग-व्यवसायात सुलभता राहावी याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. 10 लाख रुपयावरील वाहन खरेदी वेळे अगोदर एक टक्के टीडीएस लागत होता. आता तो 0.75 टक्के करण्यात आला आहे. जीवन विमा पॉलिसीच्या पेमेंटअगोदर पाच टक्के टीडीएस लागत होता. तो आता 3.75 टक्के करण्यात आला आहे. लाभांश वितरण, व्याज, अस्थाई मालमत्तेच्या भाड्यावर अगोदर 10% टीडीएस लागत होता तो आता साडेसात टक्के करण्यात आला आहे.
पगारदारांच्या टीडीएस मध्ये का कपात नाही
इतर अनेकांना टीडीएस मध्ये कपातीचा लाभ देण्यात आला असला तरी पगारदारांना टीडीएस कपातीचा लाभ का देण्यात आला नाही असे विचारले असता वित्त सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, पगारदारांना 80सीसी आणि आणि इतर सवलतीनंतर टीडीएस कापला जातो. त्यांना आता टीडीएस सवलत दिली असती तर वर्षाच्या अखेरीस या कर्मचाऱ्यांना अधिक व्याज आणि कर द्यावा लागला असता. यामुळे पगारदारांना या योजनेमध्ये सामील करण्यात आले नाही.