इंफाळ :- मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी आतापर्यत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सात आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. सदर घटना मणिपूरमध्ये 4 मे रोजी घडली. मैतेई समाजातील पुरुषांकडून कुकी समाजाच्या दोन महिलांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर त्यांची धिंड काढण्यात आली.
हा प्रकार तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, मणिपूर हिंसाचार प्रकरणावर संसदेच्या पावसाळी अधिवेसनात चर्चा करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यानंतर मणिपूरवर संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांनीा दिली.
संसदेत मणिपूरवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहावे, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत.