मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मणिपूर घटनेत आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती.
मणिपूर पोलिसांनी शनिवारी सांगितले की, व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात ही घटना 4 मे रोजी घडली, जिथे महिलांचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार –
मणिपूरमधील मेईतेई समुदाय आदिवासी आरक्षणाची मागणी करत आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला मेईतेईला आरक्षण देण्याचे आदेश दिले होते, परंतु 3 मे रोजी कुकी आणि नागा जमातींनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली आणि राज्यात हिंसाचार सुरू झाला. मेईतेई समुदाय प्रामुख्याने इम्फाळ आणि आसपासच्या मैदानी भागात राहतो, तर नागा आणि कुकी जमाती डोंगराळ भागात राहतात. आरक्षण मिळाल्यानंतर मेईतेई समाजाच्या लोकांना डोंगराळ भागातही जमीन खरेदी करता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला –
मणिपूरमधील घटनेपासून मुख्यमंत्री एन बिरेन सिंग लोकांच्या निशाण्यावर असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, शुक्रवारी बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार देत सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले.