पुणे ( प्रभात वृत्तसेवा ) – जमिन विकत घेण्यासाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचे वडगावशेरी येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतले. त्या बदल्यात जमिन गहाण ठेवली असतानाही तिची परस्पर विक्री केल्याप्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी फेटाळला.
बांदल यांनीच नाव येऊ नये, यासाठी दोघांना हाताथी धरून अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्ज घेऊन पैसे स्वत:चे फायद्याकरीता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
19 जनेवारी 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. रुपेंदरकौर आणि हरचरणपाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विक्री करण्यात आली होती.