न्यूकॅसलवर 2-0 अशी मात
लंडन – एफए करंडक फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सीटी क्लबने न्यूकॅसलचा 2-0 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मॅंचेस्टर क्लबकडून केविन डी ब्रुनी व रहिम स्टर्लिंग यांनी गोल करत संघाला हा सामना एकतर्फी जिंकून दिला. सामन्याला सुरुवात झाल्यावर पहिल्या हाफमध्येच ब्रुनीने 37 व्या मिनिटाला पहिला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली.
हा हाफ संपण्यापूर्वी न्यूकॅसल संघाकडून अत्यंत संथ खेळ झाला. त्यांचे पासिंगदेखील चांगले होत नव्हते. दुसरा हाफ सुरू झाल्यावर देखील त्यांना आपला खेळ उंचावण्यात यश आले नाही. त्याचवेळी मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत रहिम स्टर्लिंगने 68 व्या मिनिटाला गोल केला व मॅंचेस्टर सीटी संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली.
आता उपांत्य फेरीत मॅंचेस्टर सीटी क्लबचा सामना या स्पर्धेत 13 वेळा विजेतेपद मिळविलेल्या अर्सेनल क्लबशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत चेल्सीची लढत 12 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मॅंचेस्टर युनायटेडशी होणार आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे 18 व 19 जुलै रोजी होणार आहेत.
उपांत्यपूर्व फेरीत चेल्सीने लिसेस्टरचा 1-0 असा पराभव केला व उपांत्य फेरी गाठली. अर्सेनलने शेफिल्ड युनायटेडवर 2-1 अशी मात करत या फेरीत प्रवेश केला.