सातारा, (प्रतिनिधी)- दवाखान्यात जाण्यासाठी विटा (जि. सांगली) येथे निघालेल्या दोरगेवाडी (ता. माण) येथील एकाने कान्हरवाडी (ता. खटाव) येथील पाहुण्यांकडे एक दिवस मुक्काम करून तो दवाखान्यात गेला होता. मात्र, उपचारादम्यान तो करोना पॉझिटिव्ह आल्याने कान्हरवाडीकरांना धडकी भरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोरगेवाडी येथील एका वृध्दाला श्वसनाचा त्रास असल्याने सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्याला उपचारासाठी तो कुुंटुंबासमवेत निघाला होता. मात्र, दवाखान्यात वेळेत जाण्यासाठी त्यांनी वाटेत पाहुण्यांचे गाव असलेल्या कान्हरवाडीत एक दिवस मुक्काम केला. अन् दुसऱ्या दिवशी विट्याला एका दवाखान्यात गेले.
तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्याने नातेवाईकांनी त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या तपासण्या झाल्यानंतर तो प्रथम सारीचा अन् त्यानंतर करोनाचा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर खबदारीचा उपाय म्हणून कान्हरवाडी येथील इनाम मळा नावाचे शिवार प्रशासनाने सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान, गावात तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभागाच्या गाड्या धडकल्याने कान्हरवाडी येथील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाधिताच्या जवळच्या संपर्कातील दहा लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.
घाबरण्याचे कारण नाही
बाधित माण तालुक्यातील असून त्याची गणनाही माण तालुक्यात करणे अपेक्षित होते. मात्र, तो विटा येथे उपचारासाठी गेल्यानंतर जवळचा पत्ता म्हणून त्यांनी कान्हरवाडीचा पत्ता दिल्याने प्रशासनाच्या नोंदीत कान्हरवाडी असा उल्लेख आला आहे. तसेच हा रुग्ण एक रात्र कान्हरवाडीत वास्तव्य करून गेला असला तरी त्याचा संपर्क घरातील व्यक्ती सोडल्या तर बाहेर कोणाशी आलेला नसल्याने कान्हरवाडीतील लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे.
– शैलेंद्र वाघमारे (माजी सरपंच, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष)