नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीही आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार म्हणून पवार यांनी उभे रहावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातच चर्चा करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची उद्या (दि. 15) कॉन्स्टिट्युशन क्लब येथे बैठक बोलावली आहे.
या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे.