पुणे – (शिवाणी पांढरे) करोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचा रोजगार हिरावला. अशा स्थितीत बेघर आणि निराधारांसह आर्थिक संकटात असलेल्यांच्या चेहऱ्यावर “माणुसकीचा मॉल’ने हास्य फुलविले आहे. तेहसीन शेख यांच्या प्रयत्नातून आणि डॉन बॉस्को सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून दिवाळीसाठी ता गरजूनांना कपडे तसेच धान्य आणि इतर आवश्यक साहित्य या मॉलच्या माध्यमातून मोफत देण्यात आले.
“माणुसकीच्या मॉल’मध्ये गरजूंना कपडे, भांडी, लहानग्यांसाठी खेळणी, दिवाळीसाठी लागणारे साहित्य, धान्य मनाप्रमाणे घेता यावं, या उद्देशाने मॉलच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यासाठी एका हॉलमध्ये या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या असून गरजू, निराधार आपल्याला हव्या त्या वस्तू या ठिकाणी मोफत घेऊ शकतात.
काही वर्षांपूर्वी “माणूसकीची भिंत’ ही संकल्पना काही संस्थांनी राबवली होती. त्याच धर्तीवर हा उपक्रम असून, या मॉलमध्ये निगडी, पिंपरी चिंचवड, घोरपडी, खराडी भागांतील गरजू नागरिक आले होते.
“जगात जेवढे गरजू लोक आहेत, त्यापेक्षाही अधिक दाते आहेत. प्रत्येकाची इच्छा असते गरजुंना आपण मदत करावी. पण, त्यांना योग्य माध्यम मिळत नाही. फादर ऑसबर्न फर्ताडो यांच्या मार्गदर्शनाखाली डॉन बॉस्को सुरक्षाच्या मदतीने आम्ही ते माध्यम बनू शकलो. दात्यांनी दिलेल्या वस्तु, कपडे आणि धान्य यातून माणुसकीचा मॉल उभा केला. आतापर्यंत जवळपास 300 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला.
– तेहसीन शेख, समाजसेवक