पुणे -करोना तिसऱ्या लाटेच्या धास्तीने शासनाने तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचाच फटका मनपा मुख्य सभेला बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यसभा तसेच वेगवेगळया समित्यांच्या सभा ऑनलाइन स्वरुपातच घेण्याचे आदेश राज्यशासनाने सोमवारी सकाळी काढले. हे आदेश आयत्यावेळी आल्याने महापालिकेची सोमवारी दुपारची खास सभा तहकूब करावी लागली.
शहरातील करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने मनपाची मुख्य सभा तब्बल सव्वा वर्षांनंतर मागील आठवड्यात झाली. यात मागील काही महिन्यांच्या कार्यपत्रिकांवरील अनेक विषय मंजूर करण्यात आले.
या सभेनंतर आंबील ओढा येथे केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई, कात्रज-स्वारगेट मेट्रो मार्गासाठीचा वाढीव खर्च, स्वच्छ संस्थेचे आंदोलन यावरून प्रशासनावर टीका होण्याची शक्यता होती. मात्र, सभेच्या एक तास आधीच राज्य शासनाचे आदेश आले.
ही माहिती नगरसचिव विभागाकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांना देण्यात आली. त्यानंतर सर्व नगरसेवकांना सभेसाठी पालिकेत येऊ नये. ऑनलाइन सभा होईल, असा निरोप देण्यात आला.