Uttam Jankar And Mohite Patil| महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदार संघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे माळशीरमधील मोहिते पाटील घराणे आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यातील 30 वर्षांचे वैर संपुष्टात आले आहे.
जानकर यांनी तीन वेळा मोहिते पाटील विरोधक म्हणून माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवली. याशिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमध्येही मोहिते पाटील विरोधक म्हणून जानकर यांनी भूमिका बजावली. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी शुक्रवारी (ता.19) वेळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ते या मेळाव्याला उपस्थित राहिले.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना महायुतीत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नाहीतर माळशिरसमधून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देत निवडून आणण्याची ऑफर सुध्दा दिली. या भेटीनंतर जानकर रणजितसिंह निंबाळकरांना साथ देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मोहित पाटील यांना पाठिंबा देत त्यांनी महायुतीला धक्का दिला आहे.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातीतून भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना तर उत्तम जानकर यांना सोलापुरातून उमेदवारी नाकारल्याने दोघेही भाजपमध्ये नाराज होते. यातूनच मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं?