पिंपरी, दि. 19 – “महावितरणने माणुसकीने विचार करावा. लघु उद्योजकांची वीज बंद करायची असेल त्यावर जगणारी किती माणसे आहेत, त्याचा विचार करावा. उद्योगांचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी डेप्युटी सीईओला कळवा,’ अशा शब्दांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महावितरणवर ताशेरे ओढले.
तसेच पुढील काळात किती आणि कोणत्या ठिकाणी सब स्टेशन उभारणार याचा चार दिवसांत आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी मोशी येथे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने लघु उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या मेळाव्यास मावळ भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, लघुउद्योजक संघटनेचे शहराध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सपकाळ, सचिव जयंत कड, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे तसेच संजय जगताप व मोठ्या संख्येने लघुउद्योजक उपस्थित होते. यावेळी संदीप बेलसरे यांनी विविध समस्या मांडल्या. सामंत म्हणाले, छोटे आणि मोठे उद्योजक हे एकाच रथाची चाके आहेत. नवीन उद्योगाला कार्पेट टाकत असताना जुन्या उद्योगांना मोठे करून ते चालविणे हे काम आहे. लघु उद्योजकांना राजाश्रय देण्याची सरकारची जबाबदारी असल्याचे सांगून पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेच्या कार्यालासाठी भूखंड देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
…म्हणून वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेला
मावळात होणारा वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेला. कारण ती साडेतीन हजार एकर जागा ही इको सेन्सेटिव्ह होती. त्यापेक्षा चांगली जागा द्या म्हणून मागणी केली होती. मात्र, 8 महिने यावर बैठक झाली नाही. त्यामुळे वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेला. कोणामुळे काय झाले याची श्वेतपत्रिका काढणार आहोत.