वाघोली – येथील वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून नागरिक दर्शनासाठी रांगेत थांबले होते. सुमारे अर्धा किमी रांग लागली होती. वाघेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त दर वर्षी गर्दीचे प्रमाण वाढतच आहे. रात्री 12 नंतर वाघोली विकास प्रतिष्ठाणचे सदस्य नागरिक अभिषेक करतात. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते.
यावर्षी गर्दीचे प्रमाण बघता भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न ठेवता बाहेरून दर्शनाची सोय करण्यात आली होती. नुकतेच उद्योजक संतोष देशमुख यांनी 21 किलो चांदीचा मुखवटा मंदिराला अर्पण केला आहे. महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन भजन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वाघेश्वर तरुण मंडळाच्या वतीने शिवरात्री पहाटचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंदेश उमप यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी जय गणेश प्रतिष्ठानच्या वतीने लस्सीचे, हॉटेल कावेरी व गौरव डेव्हलपर्स यांच्या वतीने केळांचे, विजय गायकवाड यांच्याकडून उपवास चिवड्याचे, नवकार प्रतिष्ठाण व प्रतीक चोरडिया यांच्या वतीने चिप्स पॅकेटचे तर विक्रम वाघमारे व शांताराम कटके यांच्या वतीने पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
वाघोली विकास प्रतिष्ठाणच्या वतीने सुरक्षेततेसाठी महिला बाऊन्सर, स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. यामुळे खरेदी साठीही भाविकांनी गर्दी केली होती. तर लोणीकंद पोलिसानी कडक बंदोबस्त ठेवला होता. लोणीकंद वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र सातव, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे व पदाधिकारी, पोलीस निरीक्षक गजानन पवार, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक जयंत पाटील उपस्थित होते. महापालिकेचे कर्मचारी स्वछता ठेवत होते. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केले. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर फुलांच्या सजावटीने मंदिर खुलले होते. आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती.
“जवळपास दीड लाख नागरिकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी मुख दर्शनाची सोय करण्यात आली होती.दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. लाईव्ह दर्शन व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवक व अंगरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. लोणीकंद पोलीस ठाणे, व ग्रामस्थ यांनी मोलाची मदत केली.” – रामभाऊ दाभाडे (उपाध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान ट्रस्ट)