औरंगाबाद :- “मंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रवक्ते केले,’ अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर नाव न घेता केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणारे पवार यावेळी माध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. तर शिंदे गटात अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, वेळोवेळी मंत्रिमंडळाची तारीख पुढे ढकलली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटात यावरून काही इच्छुक आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत खराब होण्यामागे दोन कारणे असू शकतात. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्री पदासाठी अजित दादा स्पर्धक झाले आहेत.
तर, दुसरे म्हणजे त्यांच्यासोबत असलेले 40 आमदारांपैकी काही आमदार नाराज आहेत. काहींना मंत्री व्हायचे होते, त्यांना प्रवक्ते करुन ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आजारी आहे की नाही माहीत नाही, पण राज्य आजारी आहे.
तसेच, काहीजण सोडून गेले. जे राहिले आहेत ते कट्टर राहिलेले आहेत. मी राजकारणात सत्तेत जाण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला विचार जपायचा आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही शक्तीला घाबरत नाही.
घाबरलेल्या भाजपकडून फोडाफोडीच काम….
आम्ही लोकांमध्ये जायचा, विश्वास जिंकायचा मार्ग धरलाय. हा मार्ग सोपा नाही. भाजप आता कुठेतरी घाबरलेला आहे. त्यामुळे ते पक्ष फोडाफोडीच काम करत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे ते कुटुंब आणि पक्ष फोडत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर बोलले, मात्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. त्यांना कुठेतरी चुकीची माहिती गेली, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.