जळगाव – फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यांनी हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चाळीसगावात येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही. मात्र, राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.
आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली असून हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावे, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.