अकोला – विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली आहे. वंचितने खामगाव येथील प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना उमेदवारी जाहीर केली.
वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून प्रा. डॉ. अनिल अमलकार यांचे नाव जाहीर केले. अनिल अमलकार हे खामगाव येथील असून त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. ते कुणबी समाजाचे आहेत.
दरम्यान, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी कॉंग्रेस 2, राष्ट्रवादी 1, शेकाप 1 आणि शिवसेना 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, कॉंग्रेसने नागपूर येथे असलेला पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेला बहाल केला आहे.
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती – मुख्यमंत्री शिंदे
तसेच या निवडणूकांवरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीनंतर आता ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आम्हाला विचारात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा शिंदे गटाने आरोप केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये सर्व काही आलबेल सुरू असल्याचे बोलले जात आहे.