पुणे – बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
राज्यातही कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पावसाचा जोर अधिक नसला तरी जवळपास सर्वदूर हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी शिडकावा होत आहे.
कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.