पुणे -जिल्ह्यातील करोनाबाधित संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे मागील आठ दिवसांपासून सक्रिय बाधित संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. 30 जूनला पुणे जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 9 हजार 956 इतकी होती.
तर आठ दिवसात (दि. 7 जुलै) ही संख्या 10 हजार 122 वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा करोना संसर्ग वाढत असून, ही चिंतेची बाब आहे.
फेब्रुवारी 2021 पासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यावेळी जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 3 लाख 72 हजार 237 इतकी होती. तर मागील पाच महिन्यात दुप्पटीने म्हणजे 6 लाख 88 हजार बाधित वाढले आहेत.
करोनाची दुसरी लाटेने पुणे जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना संसर्ग हळूहळू कमी होवू लागला. त्यामुळे सक्रीय बाधितांमध्ये हळूहळू घट होवू लागली.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सक्रीय बाधित संख्या 3 हजार 908 इतकी होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही सक्रीय बाधित संख्या तब्बल 97 हजार 23 वर जावून पोहचली.
वाढती बाधित संख्या, मृत्युचा तांडव आणि गंभीर बाधितांची वाढती संख्या यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.
साधारण मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्येत लक्षणीय घट झाली. 23 जून रोजी तब्बल 8 हजार 493 पर्यंत सक्रीय बाधित संख्या खाली आली होती. तर बाधित संख्याही घटली होती.