पंढरपूर – संपूर्ण जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा घेतली आहे. यामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, BF.7 चे चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. अश्यातच, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील काही नियमांचे पालन करण्यास सांगितलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
करोनाचा वाढता धोका लक्ष्यात घेऊन यापुढे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना मुखपट्टी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देखील स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी असं देखील सांगितलं आहे. काल (दि. 23) शुक्रवारपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना मुखपट्टी बंधनकारक केली आहे. मात्र सध्या तरी भाविकांना मुखपट्टी लावणे बंधनकारक केले नाही. पण, येणाऱ्या काळात विषाणूचा संसर्ग वाढल्यास भाविकांना देखील मुखपट्टी बंधनकारक करण्याची शक्यता आहे.