कोल्हापूर – महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी व कोल्हापूरचा मेहनती मल्ल पृथ्वीराज पाटील याचे राजर्षि शाहू कुस्ती केंद्र, शिंगणापूर येथील घरच्या तालमीतील फटाक्यांची आतषबाजी व वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. घरच्या तालमीतील आखाड्यात लाल मातीत प्रवेश करत त्याने स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाची चांदीची गदा हनुमान चरणी अर्पण केली व आशीर्वाद घेतले.
पृथ्वीराजने ज्योतिबाचे दर्शन घेतले व शिंगणापूर येथील घरच्या तालमीत दाखल झाला. आखाड्याचे वस्ताद जालिंदर मुंडे यांनी पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन केले. शिंगणापूर रस्त्यावरून वाजतगाजत व नाचत त्याची आखाड्यापर्यंत मिरवणूक काढली. जागोजागी महिलांनी त्याचे औक्षण केले. पृथ्वीराज शिंगणापूरचे कुस्ती केंद्रात नियमित सराव करत आहे. यावेळी प्रशिक्षक सुनील फाटक यांनीही त्याचे कौतुक केले.