कार्ला, दि. 4 (वार्ताहर) -एकवीरा देवीच्या लोणावळ्याजवळील कार्ला वेहरगाव डोंगरावर मंगळवारी (दि.4) पहाटे साडे तीन वाजता देवीचा नवरात्र महानवमी होम संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाने देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता झाली. भाविकांनी एकविरादेवी दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी केली होती. तसेच एकवीरादेवी मंदिर भाविकांसाठी चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी दिवसभर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकवीरादेवी मंदिर परिसर भाविकांनी पूर्णपणे फुलून गेला होता.नवरात्र काळात सुमारे चार लाख भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
यावेळी कार्ला मंडल आधिकारी माणिक साबळे,सरपंच अर्चना देवकर,उपसरपंच काजल पडवळ, तलाठी मीरा बोऱ्हाडे, गुरव प्रतिनिधी संतोष देशमुख, अनिल पडवळ, नवनाथ देशमुख, संजय गोविलकर, मदन भोई, ग्रामपंचायत सदस्या योगिता पडवळ, पूजा पडवळ, शरद कुटे, संदिप देवकर, प्रकाश पोरवाल, गणेश देशमुख, नवनाथ देशमुख यांच्या हस्ते होम पेटवून होमाची विधिवीत पुजा करण्यात आली. यावेळी पुजारी संजय गोविलकर, तेजस खीरे, युवराज पडवळवेहरगाव दहिवली ग्रामपंचायत पदाधिकारी व वेहरगाव ग्रामस्थ उपस्थित होते. नवरात्रत्सोच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तसेच स्थानिक पातळीवर एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,राजू देवकर, अरुण देवकर, तानाजी ढमाले, दिनेश बोरकर, मीना गायकवाड, कार्ला वेहरगाव येथील स्वंयसेवक व देवस्थानचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत मंदिर व परिसरात चोख व्यवस्था ठेवली होती.
पायथा मंदिरातही होम-हवन
वेहरगाव येथील आई एकवीरादेवी पायथा मंदिरासमोर नवरात्रोत्सवानिमित्त होमहवन करण्यात आला. शिवसेनेचे मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद बोत्रे, शंकर पडवळ, भाविक धीरज भोईर, राकेश भोईर यांच्या हस्ते पूजा करून होम पेटवण्यात आला. यावेळी वेहरगाव दहिवलीचे माजी सरपंच गणपत पडवळ, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, मोरेश्वर पडवळ, व्यवस्थापक संतोष देवकर, अरुण पवार यांच्यासह भाविक उपस्थित होते .