महाबळेश्वर -सोमवारी जिल्ह्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील कोटोशी आणि हरचंदी या गावांमधील दोघांना करोनाची बाधा झाला आहे. दरम्यान, रविवारी महाबळेश्वरमधील करोना केअर सेंटरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी सापडलेल्या दोन करोनाबाधितांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील करोना रुग्णांचा आकडा 20 इतका झाला असून बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महाबळेश्वरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
महाबळेश्वर येथील संशयित करोना रूग्णांच्या सोईसाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या करोना केअर सेंटरमध्ये शनिवारी झांजवड येथील 57 वर्षीय इसमास दाखल केले होते. या इसमाला आपल्याला कोरोना झाल्याचा संशय होता. प्रशासनाने शनिवारीच त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविले होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच या इसमाने रविवारी आपल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी रात्री उशिरा या इसमाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला.
राज्य शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर मुंबई येथुन मोठ्या प्रमाणावर लोक महाबळेश्वर तालुक्यात आले आहेत. या सर्वांना जागोजागी क्वारंटाइन करण्यात आले आहे. आजपर्यंत जे जे लोक करोनाबाधित आढळून आले आहेत, ते सर्वच्या सर्व मुंबईवरून आलेले होते. अशाच काही दिवसांपूर्वी गावी आलेल्या व होम क्वारंटाइन केलेल्या 14 जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आणखी दोघांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. ज्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये कोटोशी येथील एका दहा वर्षीय मुलीला तर हरचंदी येथील 63 वर्षीय वृध्दाला करोनाची बाधा झाली आहे. या दोघांना तळदेव येथून पुढील उपचारासाठी पाचगणी येथील बेलएअर रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
तळदेव, पाचगणी व महाबळेश्वर अशा तीन सेंटरमध्ये एकूण 61 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण 20 झाली आहे, यापैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एक जण करोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या 18 जणांवर ठिकठिकाणी उपचार सुरू आहेत.