महाबळेश्वर – 700 फूट खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी महाबळेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटा कंपनीची टेस्ट ड्राईव्हची गाडी दरीत कोसळली होती. प्रतापगड घाटात मेटतळे गावाच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील टाटा कंपनीमधून टेस्ट ड्राईव्हसाठी आलेल्या ३ गाड्यांपैकी टाटा योद्धा गाडी मेटतळे गावापासून १ किमी अंतरावरील घाटात अरुंद रस्ता असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने रस्त्यालगत असणारा संरक्षक कठडा तोडून ही गाडी खोल दरीत कोसळली होती. त्यामध्ये वाहन चालक व इंजिनियर असे दोघे होते.
घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्कू टीम घटनास्थळी पोहचले. अंदाजे ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या टाटा योद्धा गाडीतील दोन्ही व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांना पुढील उपचारासाठी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.