भोपाळ – मध्यप्रदेशातील भाजप सरकारच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या 28 विधानसभा मतदार संघांतील पोटनिवडणुका तसेच बिहार मधील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 94 मतदार संघांतील निवडणुकांचा प्रचार आज संपला. या सर्व ठिकाणी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
मध्यप्रदेशात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस आहे. तेथील प्रचार सभांमध्ये कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेत या प्रचारामध्ये चांगलीच रंगत आणली आहे.
या एकूण 28 मतदार संघांमध्ये 355 उमेदवार आपले नशिब आजमवात आहेत. त्यात बारा मंत्रीही आहेत. या बहुतेक सर्व मतदार संघांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस अशी थेट लढत होत आहे. तथापि ग्वाल्हेर चंबळ भागात मात्र दोन ते तीन मतदार संघांमध्ये बहुजन समाज पक्षाचे उमेदवारही स्पर्धेत असल्याने तेथे तिरंगी लढती अपेक्षित आहेत.
बिहार मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 94 मतदार संघांमध्ये मतदान होत आहे. या 94 मतदार संघांमध्ये एकूण 1463 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यात तेथे 71 मतदार संघांमध्ये मतदान झाले होते. आत्तापर्यंत या राज्यात मोठ्या हिंसक प्रकाराची नोंद झालेली नाही.
बिहार मधील नक्षलग्रस्त भागातही शांतता कायम राखण्यात तेथील सुरक्षा दलांना यश आले आहे. अन्यथा निवडणूक काळात तेथे नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजवला जातो, तसेच बिहारच्या बाहुबली उमेदवारांकडूनही मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असतो. बिहार मध्ये तिसऱ्या आणि अखरेच्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे.