आबूधाबी :- ऋतूराज गायकवाडची नाबाद अर्धशतकी खेळी आणि फाफ डुप्लेसी व अंबाती रायडू यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 9 गडी राखून पराभव केला. विजय मिळवला असला तरीही चेन्नईचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान तर यापूर्वीच संपले होते. मात्र, त्यांनी केलेल्या पराभावमुळे आता पंजाबचेही स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.
#CSK end their #Dream11IPL 2020 campaign on a winning note.
Beat #KXIP by 9 wickets who are now out of the Playoffs race.#Dream11IPL pic.twitter.com/Pt512ByZat
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या गायकवाड व डुप्लेसी या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करताना 82 धावांची सलामी दिली. डुप्लेसी आक्रमक फलंदाजी करत असतानाच ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. त्याने 34 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या.
तो बाद झाल्यावर मात्र, अंबाती रायडूने ऋतूराजला उत्तम साथ देत संघाचा विजय साकार केला. ऋतूराज गायकवाडने 49 चेंडूत 6 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 62 तर अंबाति रायडूने 30 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 30 धावा केल्या.
पंजाबकडून गोलंदाजीत ख्रिस जाॅर्डनने 3 षटकात 31 धाव देताना एक गडी बाद केला. इतर गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आल्याने पंजाबला पराभवाला सामोरे जावं लागले.