भोपाळ – भाजपने मध्य प्रदेशातील 39 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. गुरुवारी ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील काही नावांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बालाघाट जिल्ह्यातील लांजी विधानसभेतून भाजपने ज्याचे नाव निश्चित केले आहे ते यादी जाहीर होण्याच्या काही तास आधी आम आदमी पक्षाचे सदस्य होते.
लांजी (बालाघाट) येथील राजकुमार कराये यांना भाजपने तिकीट दिले आहे, त्यांनी गुरुवारीच आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. सायंकाळी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राजकुमार यांचे नाव आल्याने सर्वांनाच धक्का बसला.
मात्र, राजकुमार यांची घरवापसी झाली आहे. ‘आप’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. राजकुमार डिसेंबरमध्ये जबलपूरमध्ये ‘आप’मध्ये सामील झाले होते. राजकुमार हे आपमध्ये जिल्हा सहसचिव पदावर कार्यरत होते. 17 ऑगस्ट रोजी राजकुमार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘आप’चा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे.