प्रभात वृतसेवा
पुणे – एका बाजूला शहरात दरवर्षी तब्बल 300 ते 400 कोटींची रंगरंगोटी, पदपथ दुरूस्ती तसेच इतर अनावश्यक कामे केली जात असतानाच; महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी अधिकृत भूमीपूजन करून काम करण्यात आलेल्या आधुनिक वाल्मिकी ग.दी माडगूळकर स्मारकाचे काम निधी अभावी रखडले होते. या स्मारकाच्या कामासाठी प्रशासनाने अखेर 8कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर, आता पुन्हा एकदा हे रखडलेले काम सुरू करताना पालिका प्रशासनाकडून नवा पायंडा पाडत कामाचा शुभारंभ समारोह ठेवला आहे.
या निमित्ताने स्मारकाच्या ठिकाणी कोणशीला लावली जाणार असून या कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. महापालिकेच्या पहिल्यांदाच अशा प्रकारे आधी भूमीपूजन त्यानंतर काम सुरू करून ते बंद ठेवणे आणि नंतर निधी मिळाल्यावर कामाच्या शुभारंभा निमित्त कौतुक सोहळा ठेवणे असा प्रकार केला जात असून प्रामाणिकपणे पुणेकरांनी कर रूपाने भरलेला पैसा अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर उडविला जात आहे.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम महापालिकेच्या भवन विभागाकडून आयोजित करण्यात आला असून या बाबतची माहिती माध्यमांना उपलब्ध करून देण्यास भवन विभागाचे अधिकारी राजकीय दबाव असल्याचे सांगत असमर्थता व्यक्त करत आहेत.
काय आहे….” उर्वरीत कामाचा शुभारंभ’
महापालिकेकडून एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचे भूमीपूजन केले जाते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू केले जाते. तर काम संपल्यानंतर संबधित प्रकल्पाचे उद्घाटन केले जाते. त्यासाठीचे ठराव महापालिकेच्या संबधित समित्यांमध्ये मान्य केले करून त्यानुसार, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, पहिल्यांदाच ज्या कामाचे भूमीपूजन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला माडगूळर कुटूंबियांनी पुजाही केली. तेच काम गेली दोन वर्षे निधी अभावी रखडले. तर अद्यापही प्रशासन निधी देण्यास तयार नव्हते.
मात्र, दिड आठवडयांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग.दी.मा सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर महापालिकेचे स्मारक कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यामुळे प्रशासनाने तातडीनं 19 मे रोजी या कामासाठीची 8 कोटींची निविदा मंजूर केली. त्यानंतर लगेचच सहा दिवसात हे काम सुरू करण्याचा निर्णय घेत, मोठा पराक्रम केल्याचे दाखवित रखडलेले काम पुन्हा सुरू होत असल्याचा शुभारंभ ठेवला आहे.
मात्र, त्यासाठी, प्रशासनाने थेट गदीमा स्मारकाचे नाव पुढे न करता याच आवारात उभारले जात असलेल्या एक्झीबिशन सेंटरचे उर्वरीत काम करणे अंतर्गत गदीमा स्मारकाचे काम सुरू करणे असा कार्यक्रम ठेवला आहे.
महापालिकेच्या अपरिपक्वतेचा परिपाक आहे. महापालिकेने या पुढे आता बांधकाम, ड्रेणेज, विद्युत, फरशी बसविणे, झाडे लावणे, भिंती रंगविणे अशा कामांचा शुभारंभ करावा, पुणेकर प्रामाणिक पणे कर भरत असून महापालिकेने हा पैसा अशाच कामात उधळणे बाकी आहे. असे नको ते कार्यक्रम महापालिका पुणेकरांचे नाव खराब करत आहे. – विजय कुंभार ( पुणे शहर कार्याध्यक्ष, आप )
महापालिकेच्या इतिहासाहातील हा ऐतिहासिक प्रसंग आहे. रखडलेल्या कामाला जबाबदार कोण याचे काही नाही मात्र, हे काम सुरू करताना पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी करण्यात महापालिका मात्र, कमी पडलेली नाही. – विवेक वेलणकर ( अध्यक्ष, सजग नागरिक मंच)