पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील 5,863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार मंगळवारपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.26 सप्टेंबर असून घरांची सोडत दि.18 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344 सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2 हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 445 सदनिका अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी सोडत होणार आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच या अर्जांची छाननीसुद्धा ऑनलाइन होणार आहे. या सोडतीचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडला. नूतन संगणकीय प्रणालीद्वारे सदनिकांची सोडत प्रक्रिया राबवली जात असून, विजेत्या अर्जदारांना तत्काळ ऑनलाइन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते अलॉटमेंट लेटर पाठवले जाणार आहे.
असा करा अर्ज
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा htttps://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी पाटील यांनी केले आहे.
सोडतीचे वेळापत्रक
- ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि.28 सप्टेंबर
- सोडतीसाठी अर्जाची प्रारुप यादी प्रसिद्धी – दि.9 ऑक्टोबर
- सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्धी- दि.16 ऑक्टोबर
- सोडत – दि.18 ऑक्टोबर 2023