मागे वळून पाहताना

रस्त्यावर लावलेली गाडी काढताना माझे मागे चालत येणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष नव्हते. त्यामुळे जवळजवळ आमची टक्करच झाली. मी गाडी कशीबशी काढण्याच्या नादात होते आणि रस्त्यावरून चालणाऱ्या त्या काकू त्यांच्या नादात होत्या. दचकून भानावर येत, मी चटकन सॉरी म्हणाले. पण त्यांनी मला सुनावलेच, की, अगं, जरा मागे वळून बघत जा गं-नाहीतर असं धडकायला होतं.

खरं होतं त्यांचं म्हणणं-विचार करताना मला जाणवलं की, काकू अगदी मोलाचं सांगून गेल्या. गाडी काढतानाच काय, गाडी चालविताना सुद्धा आरसे मागचे बघण्यासाठीच असतात ना, आयुष्याचंही असंच आहे. रोजचा नवा दिवस नवी उमेद, नवं आयुष्य, नवे संकल्प घेऊन येत असतो. पण उद्याची वाट पाहताना काल काय घडलं हेही विसरू नये. नुकतंच आपण नवीन वर्षात पदार्पण केलंय. हे नवीन वर्ष आनंदाचं जावं, सुखसमृद्धी-समाधानाचं जावं म्हणून एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. वर्ष पुढे येतच राहणार. आज प्रत्येकानं आपल्या आयुष्याचा एक टप्पा पार केला असेल. कुणी विशी, कुणी चाळीशी, तर कुणी साठीही! वयोवृद्ध, म्हणजे वयाची ऐंशी पार केलेलेही लोक हल्ली खूप बघायला मिळतात. तुम्ही आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहात, तो तुमचा वर्तमान आहे. परंतु, येथपर्यंत येण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले असतील, त्याकडे एकदा तरी मागे वळून बघा.

मागे वळून बघताना खूप आठवणी मनात दाटतील. आनंदाचे, दुःखाचे, अपमानाचे, मानाचे, समधानाचे, क्रोधाचे, आणि हो, खूप साऱ्या भावभावनांचे प्रसंग मनात फेर धरतील. पण विचार करा, यातून आपण काय शिकलो? आनंदाच्या प्रसंगी हुरळून गेलो. दुःखाने खचून गेलो. मान-अपमानाच्या बेड्यात अडकून आपण नाती तोडली तर नाहीत ना? क्रोधाच्या प्रसंगी आपण कुणाला लागेलसं बोललो तर नाही ना? आणि समाधानाच्या प्रसंगात आपण तृप्त झालो ना?

हे असं मागे वळून पाहणं म्हणजे एक प्रकारचं आत्मचिंतनच आहे. ज्या गोष्टी किंवा चुका जाणूनबुजून केल्या, त्या दुरुस्त करण्याची संधी आहे. कधी काही गोष्टी अगदी अनवधानाने किंवा नकळतही घडतात. संवेदनशील मनाला स्वतःकडे देखील साक्षेपाने बघता आलं पाहिजे. आपली चूक उमगता आणि ती कबूल करता आली पाहिजे.

आजचा काळ हा खूप वेगाचा आहे. पूर्वीच्या आयुष्यातील थोडा संथपणा, निवांतपणा विसरला आहे. माणूस सतत पुढे पुढे धावतो आहे व त्यात स्वतःच गुरफटतो आहे. यामध्ये इकडे तिकडे बघायला त्याला फुरसत नाही. तो फक्त स्वतःभोवतीच फिरतो आहे आणि त्यामुळेच तो आत्मकेंद्रित होत चालला आहे. नातेसंबंध, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी आटत चालली आहे. एक निखळ आणि स्वच्छ आरस्पानी नातं विसरत चाललो आहोत आपण. आता फक्त “स्वार्थ’ उरला आहे असं वाटतं आणि म्हणूनच मला काय मिळेल, यासाठीच अहोरात्र उरफोड चालली आहे.

पुढे जाताना तुमचा मनाचा ब्रेकच उत्तम असतो. तो लावायला हवा. तुमचं वाहन तंदुरुस्तच असायला हवं. पण तुमच्या वाहनाला (म्हणजे तुम्हाला स्वतःला) जे दोन आरसे (म्हणजे तुमचे दोन डोळे) दिले आहेत ना, ते उघडे ठेवा आणि कधीतरी मागेही वळून पाहा-कदाचित एखादी छोटी पणतीही तुमचं आयुष्य उजळून टाकील.

– आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.