नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीदरम्यान पाच राज्यांतील जागावाटपाबाबत समझोता झाला आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील असा निर्णयही घेण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी दोन्ही पक्षांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक तर आम आदमी पक्षाकडून संदीप पाठक, आतिषी आणि सौरभ भारद्वाज यावेळी उपस्थित होते. मुकुल वासनिक म्हणाले की जागावाटपावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता सहमती झाली असून दोन्ही पक्षांमध्ये पाच राज्यांबाबत समझोता झाला आहे. त्यानुसार राजधानी दिल्लीत आप चार जागा लढणार आहे तर कॉंग्रेस पक्ष तीन जागा लढेल. कॉंग्रेस चांदनी चौक, वायव्य दिल्ली (नॉर्थ वेस्ट) आणि नॉर्थ इस्ट अर्थात इशान्य दिल्लीतून निवडणूक लढेल तर उर्वरित चार जागा आम आदमी पार्टीकडून लढवल्या जातील.
गुजरातमध्ये कॉंग्रेसने आपला दोन जागा दिल्या आहेत. भरूच आणि भावनगर या जागा आप लढवणार असून बाकीच्या २४ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार रिंगणात असतील. पंजाबमध्ये मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. गोव्यातील दोनही जागा आणि चंदीगडमधील एक जागा कॉंग्रेस लढेल. हरियाणातील १० जागांपैकी ९ जागा कॉंग्रेस तर १ जागा आप लढणार आहे.
पत्रकार परिषदेनंतर बोलताना सौरभ भारद्वाज म्हणाले की आसाममधील जागावाटपाबाबतही कॉंग्रेसशी बोलणी सुरू आहे. दरम्यान, गुजरातमधील कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपसोबतच्या जागावाटपाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहीलेले अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी ट्वीट करत भरूचची जागा आपला सोडल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा कॉंग्रेसला न देऊ शकल्याबद्दल मीच माफी मागते. मात्र आपण सगळे एकत्रितपणे कॉंग्रेसला बळकट करू. अहमद पटेल यांचे ४५ वर्षांचे कष्ट आपण वाया जाऊ देणार नाही असे मुमताज यांनी म्हटले आहे.
लोकसभा 2024 साठी जागावाटप
राज्य – काँग्रेस – आप
दिल्ली – 3 – 4
गुजरात – 24 – 2
हरियाणा – 9 – 1
गोवा – 2 – 0
चंदीगड – 1 – 0