Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसने कर्नाटकमधील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण डोड्डामणी यांना उमेदवारी दिली. ते पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई आहेत. डोड्डामणी यांच्या उमेदवारीमुळे स्वत: खर्गे यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
खर्गे तब्बल ९ वेळा आमदार म्हणून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले. त्याशिवाय, गुलबर्ग्यातून २ वेळा लोकसभेचे खासदारही बनले. त्यामुळे प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पराभव न पाहिलेला नेता म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.
मात्र, त्या ओळखीला मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) धक्का बसला. त्या निवडणुकीत खर्गे यांना भाजपच्या उमेदवाराने पराभूत केले. त्यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे खर्गे आता थेट पक्षाध्यक्षाच्या भूमिकेत आहेत.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे कामकाज सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या हाती आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशीही त्यांना समन्वय ठेवावा लागणार आहे.
त्यामुळे ते स्वत: निवडणूक लढवण्याची शक्यता नसल्याचे संकेत कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिले. राज्यसभा सदस्य म्हणून खर्गे यांचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असल्याकडेही त्या सुत्रांनी लक्ष वेधले.