Lok Sabha Election 2024 । आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून महाराष्ट्रात महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील शिवसेना अर्थात शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संजय शिरसाट यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभेच्या 22 जागांवर लढण्यासाठी आम्ही आग्रही आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीची समन्वय समिती घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच जागावाटपाबाबत तडजोडीचे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर निवडणूक लढली होती. यावेळी शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढली होती. त्याच 22 जागा याही निवडणुकीत शिवसेनेला मिळाव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत. आमची भूमिकाही आमच्या पक्षातील मुख्य नेत्यांकडे मांडू. ज्यावेळी महायुतीची सर्व समन्वय समिती एकत्र बसेल, त्यावेळी अंतिम निर्णय होईल.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाचे सूत्र ठरवतील आणि यानंतर जागावाटपाची माहिती सर्वांच मिळेल. त्यामुळे आज 10, 20 आणि 22 जागा करण्यात काहीही अर्थ नाही.
2019 मध्ये लोकसभेवर ज्या जागा लढविल्या आहेत. त्या 22 जागांवर आम्ही ठाम आहोत. पण याबाबत तडजोडीचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.