बारामती – बारामती शहरातील करोनाचा प्रादुर्भाव पाहता बारामती एमआयडीसी सुरू करण्यासाठी कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत बारामती एमआयडीसी मात्र बंदच राहणार आहे.
बारामती शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात सात व्यक्ती करोना संक्रमित आढळल्या असून त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे, त्यामुळे बारामती शहर भिलवाडा पॅटर्ननुसार सील करण्यात आले आहे. बारामतीच्या औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक अशा 400 पेक्षा अधिक कंपन्यांचे जाळे आहे, असे असले तरी लॉकडाऊनमुळे बारामतीची एमआयडीसी ठप्प झाली आहे.
लॉकडाऊन शिथिल करीत राज्यातील काही एमआयडीसी कंपन्या सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामध्ये चाकण, इंदापूर, जेजुरी व कुरकुंभ एमआयडीसीचा समावेश असून यातून बारामती एमआयडीसी मात्र एमआयडीसीच्या पोर्टलवरून गायब आहे. बारामती एमआयडीसीतील कंपन्या सुरू करण्याची कोणतेही आदेश त्यामुळे प्राप्त झाले नाहीत.
रेडझोनमध्ये समावेश
करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या झोनमध्ये बारामती एमआयडीसीचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. जीवनावश्यक तत्त्वानुसार बारामतीत डायनामिक डेअरी, कॅटलफिड तसेच इतर छोट्या 8 ते 10 कंपन्या सुरू आहेत, त्या सुरूच ठेवण्याचे आदेश नव्याने प्राप्त झाले आहेत. असे असले तरीदेखील कर्मचाऱ्यांचा तुटवडा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे त्या कंपन्यादेखील संथ गतीने सुरू आहेत. सुरू असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची योग्य खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनीच्या परिसरातच कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. कंपनीच्या परिसरात कर्मचारी निवासाची सोय नसेल तर शासनाच्या आदेशानुसार कंपनीच्या वतीने बसेसद्वारे कर्मचाऱ्यांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. बसमध्ये एका आसनावरती एक असे केवळ 30 टक्केच कर्मचारी प्रवास करू शकतात. कंपनीच्या परिसरात अथवा आवारात वाहन नेण्यास सक्त बंदी करण्यात आले आहे. कंपनीच्या वतीने ने-आण करण्यासाठी असलेल्या बसला देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून पासेस देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा
बारामती एमआयडीसीतील जीवनावश्यक वगळता इतर सर्व कंपन्या बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बारामती एमआयडीसी कोणतीही कंपनी सुरू होणार नाही. सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांना देखील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आह, असे बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी संगितले.