रियाध: करोना विषाणूचा वाढत्या प्रकोपात सुद्धा सौदी अरेबिया जूनअखेर स्थानिक पर्यटन खुले करण्याची योजना आखात आहे. सौदीचे पर्यटनमंत्री अहमद बिल अकील अल खातिब यांनी याबाबत माहिती दिली. सौदीत करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तरीसुद्धा मेअखेर बरेच निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत.
अल खातिब यांनी म्हटले की, “आम्ही या मौसमात पर्यटनासाठी काही कार्यक्रम तयार केले आहे. जून अखेर स्थानिक पर्यटनावरील सर्व निर्बंध हटवण्यात येतील. आता फक्त आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहोत. यानंतर केवळ मक्का सोडून सर्व प्रकारची प्रेक्षणीय स्थळे आणि स्थानिक पर्यटन खुले करण्यात येणार’.
सौदीत आतापर्यंत जवळपास दीड लाख रुग्ण करोना बाधित आहेत. यातील 91 हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर जवळपास अकराशे करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात पर्यटनावर बंदी आहे. अनेक देशात अंतर्गत पर्यटनालाही बंदी आहे. भारतातही सर्वप्रकारच्या पर्यटनावर बंदी आहे. पर्यटन हा सौदीचा आर्थिक केंद्रबिंदू असल्याने पर्यटन खुले करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.