पाटना – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला. तेव्हापासून देशभरात भोंग्यांचं राजकारण तापलं आहे. या वादात रविवारी समाजवादी पक्षाने उडी घेतल्यानंतर आज राष्ट्रीय जनता दलाने राज ठाकरेंना खोचक टोला लागवला आहे.
राज ठाकरेंच्या आवाहनावर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने प्रतिक्रिया दिली आहे. ”ज्याप्रमाणे नमाज 5 वेळा तोंडाने म्हटली जाते, त्याचप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हणायला हवी. कॅसेट वाजवून हनुमान चालिसा नको, असं झाल्यास आम्ही त्यास चिटींग समजू,” असे राष्ट्रीय जनता दलाने म्हटले आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे.
जैसे पांच टाइम अजान कहते हैं वैसे ही पांच टाइम हनुमान चालीसा भी मुँह से होना चाहिए अगर कैसेट बजाकर हनुमान चालीसा करोगे तो तो हम इसे चीटिंग समझेंगे।
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) April 17, 2022
दरम्यान धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकारण सुरू असताना समाजवादी पार्टीच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्याने लाऊडस्पीकरवरून महागाईची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतांच्या माध्यमातून वाढत्या महागाईची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा उद्योग वाराणसीतील समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत विश्वकर्मा यांनी सुरू केला आहे.