नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची फारशी मदत मिळणार नसतानाही भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजे एलआयसीचा आयपीओ जारी करण्याचा निर्णय एलआयसी आणि सरकारने घेतला आहे.आयपीओसंदर्भातील सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याची माहिती निर्गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी पत्रकारांना दिली. या शेअरचा किंमत पट्टा 902 ते 949 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आला आहे.
यातून सरकारला 21 हजार कोटी रुपये मिळतील. सुरुवातीला आयपीओसाठी पाच टक्के भाग भांडवल विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नंतर साडेतीन टक्के भागभांडवल उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आयपीओच्या माध्यमातून सरकार 22.13 कोटी शेअरची विक्री करणार आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची मदत मिळाली नसली तरीही पाच टक्के भागभांडवल विकता आले असते. मात्र बाजारातील भांडवलाचे एलआयसीच्या आयपीओमध्ये केंद्रीकरण झाले असते. त्यामुळे आयपीओचा आकार कमी करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. मार्च महिन्यातच हा आयपीओ येणार होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाले आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार या आयपीओसाठी गुंतवणूक करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
कोणाला किती सूट
शेअर खरेदी करणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांना प्रति शेअर 45 रुपयाचा तर एलआयसीच्या पॉलीसीधारकांना प्रति शेअर 60 रुपयाची सूट देण्यात येणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आपीओ 4 मे रोजी खुला होईल. गुंतवणुकदरांना 9 मे पर्यंत शेअर खरेदीसाठी बोली लावता येणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांना किमान 15 शअरसाठी बोली लावता येईल.