नारायणगाव -बिबट्यांच्या संवर्धनासाठी भारतातील एकमेव असलेले जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व करोना प्रतिबंधासाठी मल्टिव्हिटॅमिनचे डोस देण्यात येत आहेत, अशी माहीती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली. अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला करोनाची बाधा झाल्याची घटना उजेडात आली होती.
त्यानंतर बिबट्याची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी इंडियन व्हेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या निर्देशांनुसार ही उपाययोजना केली जात आहे. दिल्लीच्या भारतीय वन्यप्राणी प्राधिकरणनाने मार्गदर्शक तत्वे जारी करून बिबट्यांसाठी विलगीकरण करण्याची सूचना केली होती. बिबट निवारण केंद्रात सध्या 32 बिबटे आहेत. त्यानुसार निवारा केंद्रात 5 विलगीकरण पिंजरेही तयार करण्यात आले आहेत.
याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर, निवारा केंद्रातील बिबट्यांचे नियमात स्क्रिनिंगही करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डिजीटल थर्मल कॅमेऱ्याचा वापर करून, ही तपासणी केली जात आहे. त्यामुळे त्यांचे वेळोवेळी स्क्रीनिंग करण्याचे काम या तंत्रामुळे वेगाने होण्यास मदत होते.
बिबट्यांना मल्टिव्हिटॅमिनचा डोस खाद्यातून दिला जातो. यामध्ये बिबट्याचे वजन आणि त्याला द्यावयाचा डोस याचे प्रमाण निश्चितीनुसार बिबट्यांना रोज मल्टिव्हिटॅमिन डोस दिले जात आहेत. 5 मिलीपासून ते 10 मिलीपर्यंत, बिबट्यांचे वजन किती आहे हे ग्राह्य धरून डोस दिले जातात. अशी माहिती बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी दिली.