पुणे – लॉकडाऊनमुळे बंद असणारे प्रादेशिक परिवहन कार्यालय शुक्रवारपासून (18 जून) सुरू होणार आहे. मात्र, या कालावधीत निर्जंतुकीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. लायसन्स आणि वाहन विषयक कामांसाठी सारथी 4 आणि वाहन 4 या प्रणालीवर अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे.
पक्का वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदी काम सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनपूर्वी लायसन्स आणि वाहन विषयक कामकाज प्रलंबित असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कामाचा निपटारा 30 जूनपूर्वी करायचे आहे. याबाबतचा अहवाल सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर खटला, आस्थापना, लेखापरीक्षण, सांख्यिकी, पोस्टल डिस्पॅच, आवक जावक आदी कामकाज आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार आहे.
वाहनांचे निर्जंतुकीकरण आवश्यक
पक्क्या लायसन्स चाचणी घेण्याआधी वाहन निर्जंतुकीकरण केल्याची खातरजमा करण्यात यावी. ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाद्वारे चाचणी घेताना प्रत्येक चाचणीपूर्वी वाहन निर्जंतुकीकरण करावे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचेदेखील निर्जंतुकीकरण केल्यानंतरच चाचणी घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याची घ्यावी लागणार दक्षता
– दोन अर्जदारांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर असावे
– एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक आणि की-बोर्ड निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे
– अर्जदारास मास्क आणि हातमोजे घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा
– कार्यालयामध्ये पुरेशा सॅनिटायझरचा साठा करून ठेवावा.