पुणे – विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा भक्कम पाठींबा कलाटणी देणारा ठरला. महाविकास आघाडी सरकार स्थापनेची वर्षपूर्ती होत असताना विधानपरिषद निवडणुकीत मिळालेले यश आगामी निवडणुकांच्या निकालांचा कलही स्पष्ट करतो. यातून आता विरोधकांच्या पोटात पराभवाचे गोळे यायला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला. या निकालानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख कटके बोलत होते.
विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविताना पुणे जिल्ह्यात शिवसेना उपनेते शिवारीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यावेळी आम्ही हे दोन्ही उमेदवार निवडून आणूच, असा ठाम विश्वास कटके यांनी व्यक्त केला होता आणि तो त्यांनी सार्थही ठरविला.
यापार्श्वभुमीवर बोलताना कटके म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढवित होते. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द भाजप असे थेट आव्हान होते. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बळ देण्याचे काम शिवसेने केले. माजी खासदार आढळराव पाटील यांनी पुणे जिल्हा पिंजून काढताना शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार नियोजनबद्ध केला. त्यामुळे हे यश मिळू शकले.
शहरी भागासह ग्रामीण भागात प्रचार करणे मोठे आव्हान असताना तालुकानिहाय तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची वाटत असताना आमच्या महाविकास आघाडीच्या उमदेवारांनी यामध्ये बाजी मारली. या यशाचे श्रेय आम्ही आमचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना देत असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमख कटके यांनी सांगितले.