पाटणा – राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह बिहारमधील विरोधी पक्षांच्या 18 नेत्यांविरोधात शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रतिबंधित भागात परवानगीविना निदर्शने केल्याबद्दल ते पाऊल उचलण्यात आले.
येथील गांधी मैदानाच्या प्रवेशद्वारावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी धरणे धरले. त्यामध्ये कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्या धरण्यावरून पोलिसांनी संबंधित नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
करोना संकटामुळे मोठा जमाव जमवण्याला मनाई करण्यात आली आहे. निदशर्नांवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. संबंधित नेत्यांनी मास्कही परिधान केले नव्हते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.