मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा वाद हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेशावर आपला हक्क सांगतो, तर दुरसरीकडे कर्नाटक महाराष्ट्रात असलेल्या कन्नड भाषिक प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या सीमा वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील हा सीमा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात तणावाचे वातावरण बनले आहे.
यातच आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे. शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रवाना झाले आहेत. मात्र, अचानक या महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली असून, बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले असून, कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. यावेळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आणि कर्नाटक पोलिसांची झटपट झाल्याचं चित्र दिसून आलं.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.