नगर -शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेंतर्गत हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई होत नसल्याने आयुक्त जावळे यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार जल अभियंत्यांनी कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.
प्रशासनाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई तसेच अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्याची मोहिम राबविली होती. 12 जानेवारी रोजी आयुक्तांनी आढावा घेतला होता. यामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे, ते नियमित करून घेणे, कारवाई करण्याच्या कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर जल अभियंत्यांनी प्रभाग अभियंता आर. जी. सातपुते, जी. के. गाडळकर, मनोज शिंदे, कैलास महामिने, फिटर अफाक शेख, फिटर मदतनीस शेख अय्युब मेहबूब, शकील कादर पठाण, राजू सातपुते यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ठेवला होता. आयुक्तांनी त्यांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.