पटना – बिहार विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. अशातच लोक जनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी आज पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या जनता दलाविरोधात दंड थोपटले आहेत.
चिराग पासवान यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत लोजपने उमेदवार न दिलेल्या जागांवर भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. पासवान यांनी यापूर्वीही आपला पक्ष एनडीएसोबत निवडणूक लढवत नसला तरी आपला भाजपला पाठिंबा कायम असल्याचे म्हंटले होते.
पासवान यांनी हीच भूमिका कायम ठेवत आज लोजप उमेदवार नसलेल्या जागांवर भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र हा संदेश देतानाच त्यांनी नितीश कुमार यांच्याविरोधातील आपली भूमिका मात्र कायम ठेवली. या ट्विटमध्ये त्यांनी राज्यात येणारे सरकार हे नितीश कुमार मुक्त सरकार बनेल, असाही दावा केला.
दरम्यान, चिराग पासवान यांच्या या ट्विटनंतर भाजप-लोजपमध्ये छुपी युती असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
आप सभी से अनुरोध है की जहां भी @LJP4India के प्रत्याशी चुनाव लड़ रहे है उन सभी स्थानो पर #बिहार1stबिहारी1st को लागू करने के लिए लोजपा के प्रत्याशीयो को वोट दें व अन्य स्थानो पर भारतीय जनता पार्टी के साथीयों @BJP4Delhi को दें।आने वाली सरकार #नीतीशमुक्त सरकार बनेगी।#असम्भवनीतीश
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 25, 2020