250 शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याचा धडाका
शिक्षणाधिकारी “आऊट ऑफ कव्हरेज एरिया’
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू केलेली असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी चालू वर्षात काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्यपणे तब्बल 250 शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत.
शिक्षण विभागात शासनाचे नियम डावलून कामकाज करण्याचा धडाकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लावला आहे. चुकीच्या पद्धतीने शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता दिल्याबाबत प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे महासचिव आदिनाथ माळवे यांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. राज्यात दि.2 मे 2012 नंतर शिक्षक भरतीला शासनाने बंदी घातली होती. मात्र, या काळात बहुसंख्य शाळांत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांना वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत.
मागासवर्गीय कक्षाने मंजूर केलेली बिंदूनामावली धुडकावत मूळ आरक्षित जागांवर इतर प्रवर्गांतील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शाळांना 20 टक्के अनुदान देण्यात मंजूर करण्यात आले आहे. परंतू मान्यता न घेता जादा पदे सर्रासपणे वाढवून देण्यात आली आहेत. यामुळे सुमारे 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे, असे माळवे यांनी अर्जात म्हटले आहे. शिक्षण आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रार अर्जातील बाबींनुसार, याची सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना बजाविले आहेत.