पुणे – साधारण दोन महिन्यांपूर्वी पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू झालेले भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतील पाइपलाइनचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे मागील तीन दिवसांपासून पुन्हा थांबले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकीय यंत्रणाही सुस्त पडल्याने आणि त्यातच कामही थांबल्याने हा प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मागील काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. मध्यंतरी या योजनेला गती देण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात धनादेशही देण्यात आले आहेत. यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये या योजनेतील रखडलेल्या पाइपलाइनचे काम हाती घेतले.
त्यावेळी साधारण पावणेतीन कि.मी. पाइपलाइनचे काम राहिले असताना या कामाला खो बसला. त्यानंतर पुन्हा मागील दोन अडीच महिन्यांत पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरू झाले असून 700 मीटर कामही झाले आहे. परंतू स्थानिक नागरिकांनी पुन्हा विरोध केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गेडाम यांनी काम थांबले असल्याबाबत दुजोरा दिला आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा