Stock Market : निर्देशांकांत मोठी वाढ; ताळेबंदच्या आधारावर गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी

मुंबई – जागतिक बाजारातून गुरुवारी सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर बऱ्याच कंपन्या ताळेबंद जाहीर करीत आहेत. त्या आधारावर गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात वाढ नोंदली गेली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 638 अंकांनी वाढून 52,837 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 191 अंकांनी वाढून 15,824 अंकांवर बंद झाला.

आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसीस, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, बजाज फिन्सर्व, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ झाली. मात्र बजाज ऑटो, एशियन पेंट्‌स, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.

गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार निर्देशांकात घट झाली होती. मात्र काही गुंतवणूकदार ताळेबंदाच्या आधारावर निवडक कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांना चांगला आधार मिळाला. माहिती तंत्रज्ञान, धातू कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली.

आगामी काळातही आरोग्य, रसायन क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नसल्यामुळे गुंतवणूकदार या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत असून गुंतवणूदारांकडून या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान हॅवेल्स कंपनीने चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरच्या भावात सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. या कंपनीने पहिल्या तिमाहीमध्ये मिळवलेल्या नफ्यात चार पट वाढ झाली असून कंपनीला या तिमाहीत 935 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आगामी काळात कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढणार असल्याचे कंपनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.