नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट झाली. भारतीय रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. या कारणामुळे भारतीय बाजारात सान्याच्या दरात गुरुवारी मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 264 रुपयांनी कमी होऊन 46,452 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर चार रुपयांनी वाढून 65,484 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
या संदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की गेल्या दोन आठवड्यापासून अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे.
त्यातच भारतीय रुपयाचे मूल्य वाढत असल्यामुळे सोन्याची आयात महागात पडत आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे एकूणच जागतिक बाजारात अस्थिरतेची परिस्थिती आहे. ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच चालू राहण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, जागतिक बाजारामध्ये सोन्याचा दर कमी होऊन 1,797 डॉलर व चांदीचा दर 25.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर राहिला.